सावधान ! पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय

सावधान ! पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय

Source: Dainik Prabhat | Posted on 20 July 2019

सावधान ! पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय

पुणे – सतत होणाऱ्या विषारी वायू उत्सर्जनामुळे पुणे परिसरातील हवामानाची स्थिती मोठ्या प्रमाणात खालावली आहे. श्‍वसन रोगांची संख्या वाढत आहे व याचा सगळ्यात वाईट परिणाम सर्वसामन्यांवर होत आहे. परिणामी, पुण्यातील नागरिकांचे आयुर्मान तब्बल 3.5 वर्षे इतकी कमी होत असल्याचे एयर क्वालिटी लाईफ इंडेक्‍स या शिकागो विद्यापीठातील एपिक इंडिया या संस्थेच्या अभ्यासातून समोर आले आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये हवा प्रदूषण आणि पर्यावरणाविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या “स्टार रेटिंग’ उपक्रमांतर्गत फर्गसन महाविद्यालय येथे वायू प्रदूषणाविषयी शिकागो विद्यापीठाच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात महाविद्यालयाचे 55 विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यापीठाचे इशान चौधरी यांनी स्टार रेटिंग वेबसाईटचा वापर करून तरुण मंडळी वायू प्रदूषण रोखण्यासाठी जास्तीतजास्त बदल कसा घडवून आणू शकतात, या बाबत मार्गदर्शन केले.

जागतिक आरोग्य संस्था (WHO) च्या वायू प्रदूषणाबद्दलच्या मापकांचे पालन केले, तर लोकांचे आयुर्मान काही वर्षांनी वाढू शकेर्लें असेही त्यांनी सांगितले. शिकागो विद्यापीठाने या वर्षी एयर क्वालिटी लाईफ इंडेक्‍स, अर्थात ए.क्‍यू.एल.आय या वेबसाइट सुरूवात केली आहे. ही जगातील एकमेव वेबसाइट आहे, ज्यात वायू प्रदूषणाचा मनुष्याच्या आयुर्मानावर नेमका किती फरक पडतो, याबाबत माहिती मिळते. प्रदूषण नियंत्रण महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या स्टार रेटिंग उपक्रमामध्येही याचा समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून केवळ औद्योगिकच नव्हे, तर शहरी हवेच्या प्रदूषणाच्या माहितीसंदर्भातील सुविधाही नुकतीच उपलब्ध करून देण्यात आली आहे.